नांदेड - जिल्ह्यातील विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा असेल. नवीन कामे सुरू करण्याचा माझा आग्रह राहील. मात्र, जे काम मी प्रामाणिकपणे पूर्ण करू शकेल. त्याच कामाचे भूमिपूजन करेल. खोट्या कामाचे कधीच भूमीपूजन करणार नाही, असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले. ते अर्धापूर येथील पाणीटंचाई आढावा बैठकीत बोलत होते.
खासदार चिखलीकर यांनी जिल्ह्यात 'खासदार आपल्या दारी' या अभियानाला प्रारंभ केला आहे. त्याची सुरुवात भोकर मतदारसंघातून केली. मुदखेड, भोकर आणि अर्धापूर या ठिकाणी त्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी तिन्ही तालुक्यातील विविध खातेप्रमुखांची पाणीटंचाई निवारणार्थ बैठक घेऊन त्यांना विविध प्रलंबित कामाच्या अनुषंगाने चांगलेच धारेवर धरले. यापुढे कुठल्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हयगय खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने जनतेच्या कामांना प्राधान्य देत प्रलंबित कामे जास्त दिवस ताटकळत ठेवू नयेत, असे ठणकावून सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार दुष्काळ आणि पाणीटंचाई निवारण करण्याच्या संदर्भाने प्रशासनाने गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.