नांदेड - शेतावर काम करण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा त्यांच्याच शेतात असलेल्या विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जिरोना (ता. उमरी) शिवारात रविवारी (ता. २७) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिरोना गावावर शोककळा पसरली आहे. सुनंदा साहेबराव चुनुकवाड (वय ४०) आणि कविता चुनुकवाड (वय २०) असे मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुनंदा ह्या त्यांची मुलगी कवितासह शेतात कामासाठी गेल्या होत्या. त्या दोघीही शेतात काम करत असताना बांधावर चरत असलेली गाय तुंडूंब भरलेल्या विहिरीकडे जात होती. विहीर जमिनीबरोबर असल्याने त्यात गाय पडेल म्हणून तिला हाकलण्यासाठी कविता ही धावत विहिरीकडे गेली. मात्र तिचा तोल गेला आणि ती विहिरीत पडली. कविता विहिरीत पडल्याचा आवाज आला. तेव्हा आई सुनंदा विहिरीकडे धावता आली. पाण्यात बुडणाऱ्या आपल्या पोटाच्या गोळ्याला काढण्यासाठी सुनंदा ह्यांनी पोहता येत नसताना हिंमतीने विहिरीत उडी घेतली. मात्र या घटनेत त्या दोघीही पाण्यात बुडाल्या.