नांदेड - माहूर तालुक्यातील कृषी विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक योजना रखडल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
माहूर कृषी अधिकारी कार्यालय सलाईनवर, रिक्त पदांमुळे अनेक योजनांपासून शेतकरी वंचित येथील रिक्त जागेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे. शेतकरीभिमुख कामे होत नाहीत. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळी आणि इतर मोठे अभियान राबविताना अडचणी येतात. कृषी विमा योजनांसाठी अधिक मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे परिणामी या सर्व योजना, अभियान आणि कार्ये अपर्याप्त मनुष्यबळामुळे ठप्प पडली आहेत.
तालुका कृषी कार्यालयाच्या कामकाजाची पूर्ण कल्पना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना असूनसुद्धा कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना या ठिकाणी होताना दिसत नाही. माहूर तालुका कृषी अधिकारी व तांत्रिक अधिकारी (कृषी) यांच्यासह 3 कृषी पर्यवेक्षक, 1 कृषी सहाय्यक, 1 कार्यालयीन अधीक्षक, 1 शिपाई अशी 8 पदे येथे रिक्त आहेत.त्यामुळे या रिक्त जागा भरण्याची परिसरातून मागणी होत आहे.
शेतीपूरक व्यवसायासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था (आत्मा) प्रकल्प कार्यरत आहे. मात्र, कृषी विभागाच्या वरिष्ठांच्या दुर्लक्षाने माहूर तालुका तंत्र व्यवस्थापक (आत्मा) हे पद गेल्या 2 वर्षांपासून रिक्त आहे.