नांदेड - शहरातील महत्वाची शासकीय कार्यालये उडवून देण्याची धमकी देत १० कोटी रुपयांच्या खंडणी मागणीचा ईमेल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आला होता. या प्रकाराने प्रशासकीय विभागात खळबळ उडाली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने तातडणी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांच्या मदतीने ईमेल पाठवणाऱ्या आरोपी तरुणास अर्धापुरातून ताब्यात घेतले आहे. इसम नामे शेख अब्दुल रफीक पि.अब्दुल रऊफ ( वय ३५ वर्ष ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानेही रविवारी ही कारवाई केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेलवरवरून मागितली खंडणी
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेलवर १० कोटी रुपयांची खंडणीची मागणी करत शहरातील सर्व कार्यालये उडवून देण्याच्या आशयाचा निनावी ईमेल दिनांक ८ आणि ९ मे ला आला होता. यामध्ये आरोपीने 'नांदेड शहरातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उप जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकीत्सक अशी महत्वाची कार्यालये आणि अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. प्रशासनाने १० कोटी रुपये न दिल्यास हे सगळे नष्ट होईल, मात्र आम्हाला सर्वसामान्य जनतेमध्ये भिती पसरावयाची नाही; त्यामुळे हे प्रकरण जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत गोपनीय राहील. तसेच हा मेल फक्त पैसे पाहिजे म्हणून केला आहे. त्यामुळे ८ मे च्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत पैसे पोहोच झाले पाहिजे, असे सूचित करून खंडणीची मागणी करण्यात आली होती. पैसे न मिळाल्यास शहरातील १२५ पेक्षा जास्त हॉटस्पॉट फुटायला तयार आहेत, लिस्ट सोबत जोडलेली आहे. यावर विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाही तर फोडुन दाखवतो, कोणत्याही हॉटस्पॉट ची निवड करा' अशी धमकी देखील या ई-मेलमधून देण्यात आली होती.
नांदेडमधील शासकीय कार्यालये उडवून देण्याची धमकी; खंडणीचा ईमेल करणारा तरुण अर्धापुरातून अटक - अर्धापुरातून धमकीचा मेल
प्रशासनाने १० कोटी रुपये न दिल्यास हे सगळे नष्ट होईल, मात्र आम्हाला सर्वसामान्य जनतेमध्ये भिती पसरावयाची नाही; त्यामुळे हे प्रकरण जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत गोपनीय राहील. तसेच हा मेल फक्त पैसे पाहिजे म्हणून केला आहे. त्यामुळे ८ मे च्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत पैसे पोहोच झाले पाहिजे, असे सूचित करून खंडणीची मागणी करण्यात आली होती.
जिल्हा प्रशासनाला आलेल्या या ईमेलमुळे खळबळ उडाली होती. मात्र, जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरुन जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दाराकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल, पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे व त्यांच्या पथकाची नियुक्ती केली. सायबर सेलच्या पथकाने ईमेल, आयपी अॅड्रेस याचा तपास सुरू केला. त्यामध्ये त्यांना संशयित आरोपीचा सुगावा लागला.
अर्धापुरातून अटक
सायबर सेलला मिळालेल्या माहितीवरुन धमकी देणारा संशयित तरुण हा अर्धापूर येथील आगापुरा परिसरात राहणारा शेख अब्दुल रफीक पि.अब्दुल रऊफ ( वय ३५ वर्ष ) हा असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलीस पथकाने रविवारी(२३ मे) त्याला अर्धापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौकशी सुरू केली असता, आरोपीने त्याच्या मोबाईलवरुन वरील नमुद कार्यालयास ई मेल केल्याचे केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. यातील आरोपी शेख अब्दुल रफिक याचा इतर व्यक्ती किंवा संघटनेशी संबंध आहे का? याबाबत पोलीस चौकशी आणि तपास सुरू आहे.
या पोलीस पथकाने केली कारवाई-
जिल्हा प्रशासनाला धमकी देऊन खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीला गजाआड करण्याची ही धाडसी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , विजय कबाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांचे सुचना व आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराटे, जमादार गंगाधर कदम, पो. कॉ. बजरंग बोडके व सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक थोरवे, पो. कॉ. सिटीकर, पो. कॉ. बडगुजर यांनी पार पाडली आहे.