मुंबई- Gram Panchayat Election 2023 : आज (5 नोव्हेंबर) राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्यभरातील जवळपास 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल.
Live updates-
- रायगड जिल्ह्यात मतदार एकूण 20.59 टक्के मतदान झाले आहे. सर्व 15 तालुक्यातील 210 ग्रामपंचायतमध्ये मतदान आहे. 179 ग्रामपंचायतमध्ये प्रत्यक्ष मतदान असून 652 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. आतापर्यंत सर्व मतदान सुरळीत झाले आहे.
- कोल्हापुरातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली आहे. पण या निवडणुकीला काहीस गालबोट लागल्याचे चित्र आहे. कोल्हापूरच्या चिंचवाड मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला आहे. या केंद्रावर मतदान बूथच्या आतमध्येच उमेदवार प्रतिनिधी याची जोरदार शिवीगाळ आणि बाचाबाची झाली. उमेदवार प्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात चिंचवाड हे गाव येते. या गावात महाडिक आणि सतेज पाटील गट एकत्र येवून पॅनल उभे केले आहेत. त्यांच्या विरोधात याच गटातील नाराजांनी अपक्ष पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे या गावातील निवडणुक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची बनली आहे.
अजित पवार यांची काटेवाडीत प्रतिष्ठा पणाला-राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, थेट जनतेमधून सरपंच निवडण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी गावागावात चुरस आहे. गावगाड्याचा कारभार ठरविला जात असताना काही बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडीत अजित पवार गट विरोधात भाजपा पुरस्कृत पॅनेल अशी लढत आहे. राष्ट्रवादीत बंडखोरी करून उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार हे काटेवाडीत बाजी मारणार की भाजपाचा उमेदवार, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.