नांदेड - मुखेड मतदारसंघातील वातावरण आता चांगलेच तापले असून जवळपास सर्वच पक्षातील नेतेमंडळी जोमाने तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे भाजपमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. मुलाखतीच्या वेळी विद्यमान आमदार एकाकी पडल्याचे दिसून आले. तर आता मुखेडातील ‘हम पांच’ने नुकतेच खासदार प्रताप पा. चिखलीकर यांची भेट घेतली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
हेही वाचा -गोदावरी नदीपात्रात सेल्फी काढताना तिघे गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडला
या बैठकीत मुखेड मतदारसंघात ‘बदल हवा’ ही एकमेव मागणी करण्यात आली असून बदल न केल्यास गड धोक्यात जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसरीकडे रामदास पाटील यांची उमेदवारी अंतिम असल्याचे बोलले जात आहे. मुखेड मतदारसंघात विद्यमान आमदारांनी मतदारसंघातील जनतेचा तसेच पुढार्यांचा कमालीचा रोष ओढावून घेतला असून याचा परिणाम आता त्यांना भोगावा लागत आहे. मुलाखतीच्या दरम्यान अनेकांनी विरोध करत उमेदवारीची मागणी केली. त्यानंतर मराठा समाजाने देखील सोशल मीडियावर त्यांचा उघडपणे विरोध सुरू केला आहे. मराठा समाजातील प्रतिष्ठीत व धुरंधर उघडपणे विद्यमान आमदारांचा जाहीर विरोध करताना दिसत आहेत. त्यातच ‘हम पांच’ समूह त्यांच्या कार्यप्रणालीच्या विरोधात होताच पण त्यांनी देखील आता टोकाची भूमिका घेतली आहे.