नांदेड - महापोर्टल बंद करून सर्व सरळसेवा भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविणे व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवणे, या मागणीसाठी सोमवारी स्पर्धा परीक्षा संघर्ष समतीचे अध्यक्ष बळवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महापोर्टलची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
नांदेडमध्ये महापोर्टलची काढली अंत्ययात्रा महापरीक्षा पोर्टल पद्धत (ऑनलाईन परीक्षा पद्धती) बंद करून सरळ सेवा नोकर भरतीतील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत किंवा सक्षम असा वर्ग-३ व वर्ग-४ चे राज्यातील पद भरती प्रक्रिया घेणारा आयोग तत्काळ नेमावा. महापोर्टलअंतर्गत घेण्यात आलेल्या मागील सर्व परीक्षा रद्द करून झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्यात
यावी व संबंधितावर त्वरित गुन्हे दाखल करावे.
हेही वाचा -लग्नात रक्तदान; अमरावतीतील अनोखा विवाह सोहळा
जिल्हा परिषदेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा कुठल्याही एका जिल्ह्याचा फॉर्म ठेवून उर्वरित जिल्ह्यात फॉर्म वगळून भरून घेतलेली परीक्षा शुल्क त्वरीत परत करावे. पूर्वी भरलेल्या अर्जाची परीक्षा 'ऑफलाईन' पद्धतीने १५ दिवसांच्या आत घेण्यात यावी. राज्यसेवा पूर्व परीक्षा पद्धतीत बदल करून त्यातील सीसॅट या विषयाचा पेपर युपीएससीच्या धर्तीवर करावा (म्हणजेच किमान गुण अर्हतेवर ३३ टक्के गुण आधारीत असावा), पीएसआय, एसटीआय, एएसओ इ. पदांसाठीची संयुक्त परीक्षा पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणेच प्रत्येक पदांसाठीची परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात यावी. आयोगातील सदस्य संख्या लवकरात लवकर पूर्ण करावी. शिक्षक व प्राध्यापकांची भरती प्रक्रिया केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात सक्षम असा आयोग नेमून घेण्यात यावी व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत.
हेही वाचा -चाकणमध्ये वर्कशॉप मालकाची दगडाने ठेचून हत्या; हल्लेखोर फरार
राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच (ग्राऊंड अगोदर नंतर लेखी, जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात यावी) राज्यात जाहीर केलेली ५५ हजार पदे त्वरित भरण्यात यावीत, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महापोर्टलची प्रतिकात्म अंत्ययात्रा काढली व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी स्पर्धा परीक्षा संघर्ष समतीचे अध्यक्ष बळवंत शिंदे, मार्गदर्शक अतुल रांदड, उपाध्यक्ष राजेश पूपूलवार, सचिव रविराज राठोड, संघटक शंकर पांचाळ, वीरभद्र डखणे, संभाजी लोहबंदे, बळवंत सावंत, राजेश आंबटवार, शिवाजी शिंदे, अमोल कासारे, पंकज कासारे, अमोल देवसरकर, गजानन मनूरकर आदींचा सहभाग होता.