नांदेड -हिमायतनगर तालुक्यातील प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कामारवाडी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने आपली जीवनयात्रा संपविली आहे. नातेवाईकांकडून लग्नासाठी विरोध होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दत्ता गणेश भिंगोरे (वय २४) व शारदा खंडू माने (वय २५ वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत.
विवाहित महिलेची प्रियकरासोबत गळफास घेऊन आत्महत्या; हिमायतनगर तालुक्यातील घटना - नांदेडमध्ये प्रेमीयुयुलाची आत्महत्या
हिमायतनगर तालुक्यातील प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कामारवाडी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने आपली जीवनयात्रा संपविली आहे.
प्रियकरासोबत विवाहितेची आत्महत्या -
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील दत्ता गणेश भिंगोरे (वय २४) व शारदा खंडू माने (वय २५ वर्ष रा. चिकाळा, सध्या मुक्काम कामारवाडी) यां दोघांमध्ये मागील अनेक दिवसापासून प्रेम संबंध जुळले होते. विवाहित असलेली ती युवती आपल्या पतीसोबत वारंवार होत असलेल्या भांडणामुळे मागील ४ वर्षांपासून कामारवाडी येथे असलेल्या मामाच्या घरी वास्तव्यास होती. यामध्ये या दोघांचे प्रेमसंबंधाची माहिती नातेवाईकांना समजली आणि त्यांनी व दत्ता नामक युवकाच्या घरच्यांनी दोघाच्या प्रेमसंबंधाला विरोध केला. त्यामुळे दत्तांच्या आई-वडिलांनी त्याचे लग्न करण्याचे ठरविले आणि सोयरिकही करण्यात आली होती.
प्रेमाला होणाऱ्या विरोधामुळे टोकाचे पाऊल -
मात्र दत्ता शारदा सोबत लग्न करण्याच्या विचारात होता. नातेवाईकांचा वाढता विरोध पाहून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी सकाळी गावालागत असलेल्या वानखेडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सकाळी उघडकीस येताच कामारवाडीचे पोलीस पाटील नागोराव भिंगोरे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांचे मृतदेह हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.