नांदेड - लोकसभा निवडणुकांचे बिगुल रविवारी वाजले. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच आचारसंहितादेखील लागू झाली आहे. नांदेड, लातूर आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघांसाठी १८ एप्रीलला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या तीनही जिल्ह्यात एकूण २५ लाख मतदार या वेळी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ, हिंगोली लोकसभा मतदारसंघात २ विधानसभा मतदार संघ तर लातूर लोकसभा मतदारसंघात एक विधानसभा मतदारसंघ येतो. या तीनही मतदारसंघातील २५ लाख २ हजार २४४ मतदार आणि त्यांच्यासाठी २९५५ मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या तिनही ठिकाणी १८ एप्रिलला मतदान होणार आहे. रविवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी गेल्या महिनाभरापासून सर्व तयारी सुरु करण्यात आली असून, वेगवेगळ्या मतदान केंद्रासंदर्भात व एकूण मतदार संख्येसंदर्भात पडताळणी पुर्ण करण्यात आली आहे.