नांदेड- मुखेड तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्प बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या मावेजाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. मुक्रमाबाद येथील प्रकल्प बाधीत घरांचा मावेजा दिला नाही तर श्री गणेश विसर्जन करणार नाही, असा पावित्रा येथील प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. परंतु, या मागणीकडे संबंधीत प्रशासनाने पाठ फिरवली असल्यामुळे मुक्रमाबाद येथील प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांनी मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन रात्री उशिरापर्यंत चालूच होते.
आंदोलन करताना आंदोलनकर्ते
लेंडी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन ३३ वर्षे झाली. तरीही मुक्रमाबाद (ता.मुखेड) येथील १ हजार ३१० प्रकल्पबाधीत घरांच्या मावेजाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. अंतिम निवाडा (आवार्ड) पास होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ ऊलटला आहे. शिवाय शासनाकडून निधीची ऊपलब्धता होऊनही त्या प्रल्पग्रस्तांना थकीत मावेजा देण्यास संबंधीत प्रशासन वारंवार टाळा-टाळ करीत आहे. मुक्रमाबाद येथील लेंडी प्रकल्पग्रस्तांनी मावेजासाठी वेळोवेळी निवेदने दिली. रास्ता-रोको आंदोलन, बाजारपेठ कडकडीत बंद ठेवणे, धरणे आणि आदी आंदोलने केली. परंतू संबंधीत प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करत केवळ आश्वासने देत झुलवत ठेवले आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे लेंडी प्रकल्पग्रस्तांना ९ सप्टेंबरपर्यंत मुक्रमाबाद येथील प्रकल्प बाधीत व संपादित घरांचा मावेजा न दिल्यास दि.१० सप्टेंबर २०१९ पासून बेमुदत रास्ता-रोको आंदोलन करण्यात येईल व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येईल आणि दि.१२ सप्टेंबर रोजी होणारे श्री गणेश विसर्जन करणार नाही, असा इशारा या प्रकल्प बाधीतांनी संबंधीत प्रशासनास दिला होता. तसेच आगामी विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कारही टाकू, असाही इशारा दिलेला आहे. असे असतांनाही संबंधीत प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे अखेर काल मुक्रमाबाद येथील बाजारपेठ बंद ठेऊन सकाळी दहा वाजता मुख्य रस्त्यावर प्रकल्प बाधीतांसह गावक-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.यावेळी पोलीस व प्रशासनाच्या अधिकारी प्रतिनिधींनी हे आंदोलन करु नये यासाठी मध्यस्थितीचे प्रयत्न केले.परंतू केवळ पोकळ आश्वासने आहेत असे म्हणत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.रात्री उशिरा पर्यंत आंदोलकानी आंदोलनाची सांगता केली नाही व ते चालूच ठेवले होते.
रात्री उशिरा पर्यंत उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांची प्रकल्पग्रस्तासोबत मध्यस्ती चालू होती. पण, ही चर्चा निष्फळ ठरली. जोपर्यत ७७ अ ची संपूर्ण नोटीस वाटप करत नाही व जिल्हाधिकारी स्वतः येवून प्रकल्पग्रस्ताना भेट देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भुमिका धरणग्रस्तांनी घेतल्याने हे आंदोलन सुरुच राहिले. परंतु रात्री ९ वाजेपर्यंत तरी कोणतेही वरीष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी पोहचले नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी रात्रभर भजन आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले.
अंदोलनात अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आले आहे.