नांदेड -भारतीय पोलीस दलातील (IPS) अधिकारी सोमय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील मरदीन टोला परिसरात तब्बल नऊ तास नक्षल्यांशी झुंज दिली. यावेळी नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेसह 26 जणांना कंठस्नान घालण्यात आले. ही कारवाई करणारे सोमय विनायक मुंडे हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील मूळ रहिवासी आहेत.
आयआयटीमध्ये झाले शिक्षण -
31 वर्षीय सोमय विनायक मुंडे यांनी आयआयटी पवईमधून एमटेक (M.tech.) पूर्ण केले. सोमय यांचे प्राथमिक शिक्षण हे देगलूर येथील साधना हायस्कूलमध्ये झाले आहे. तर माध्यमिक शिक्षण-सातारा सैनिकी शाळा आणि ८ वी ते १० वी हे माध्यमिक शिक्षण राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज, देहराडून येथे झाले आहे. त्यानंतर सोमय यांनी 11वी आणि 12वीचे शिक्षण हैदराबाद येथे पूर्ण केले. सोमेय यांनी 2016 केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत भारतीय पोलीस दलात रुजू झाले.
पहिली पोस्टींग होती औरंगाबादमध्ये -
सोमय मुंडे यांची पहिली पोस्टींग ही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे झाली होती. त्यानंतर ते अतिरीक्त पोलीस अधिक्षक (ASP) अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे रुजू झाले. सद्या ते गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथे अतिरीक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.