नांदेड- मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह दोन वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर गिरगाव (ता. वसमत) येथील चार तरुण दुचाकीवरून दारू पिण्यासाठी 19 मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास आले होते. त्यांनी बाहेरून दारू आणल्याने हॉटेलचे व्यवस्थापकाने त्यांना तेथे दारु पिण्यास मनाई केली. त्यावेळी चौघांनी व्यवस्थापक विद्यासागर गोविंद तारू (वय ३०), वेटर खुशाल गोविंद तारू ( वय २३) आणि मनोज अशोक शेळके (वय २७) यांच्यावर चाकूने हल्ला केला.
हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई केल्याने वेटर, मालकावर चाकू हल्ला - नांदेड
मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह दोन वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
यात मनोज शेळके याच्या पोटातच चाकू अडकल्याने तो गंभीर जखमी झाला आहे तर, विद्यासागर गोविंद तारु यालाही जबर दुखापत झाली आहे. या तिघांना नातेवाईकांनी नांदेडच्या तिरुमला रुग्णालयात दाखल केले. मनोज शेळके यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस जमादार एन.एस लोखंडे यांनी सांगितले.
हल्ला करून आरोपी सोबत आणलेल्या दोन दुचाकी गाड्या तिथेच सोडून पसार झाले. पोलिसांनी या दोन्ही गाड्या जप्त केल्या आहेत. घटनास्थळाला अर्धापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुट्टे यांनी भेट दिली. तर रुग्णालयात अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे , पोलीस उपाधिक्षक बाळासाहेब देशमुख यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या प्रकरणात तीन आरोपी असल्याचे हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याचे पोलिसांनी सांगितले.