नांदेड:भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून हीचा उद्देश राजकीय फायद्या-तोट्यासाठी नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत त्याला काँग्रेस महत्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे. ही यात्रा (Bharat jodo yatra) ‘मन की बात’ ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.
देशातील विदारक परिस्थिती समोर: भारत जोडो यात्रेसंदर्भात माहिती देताना जयराम रमेश पुढे म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत निघालेली ही पदयात्रा देशातील विदारक परिस्थिती जनतेला अवगत करण्यासाठी आहे. देशात सध्या असलेली आर्थिक विषमता, समाजिक धृवीकरण व राजकीय हुकूमशाहीच्या विरोधात आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची घसरण यासाह सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा आहे. राहुलजी गांधी दररोज शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, छोटे व्यापारी यांच्या समस्या, व्यथा जाणून घेत आहेत.
पदयात्रेला मोठा प्रतिसाद: महाराष्ट्रात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ६३ दिवस, ६ राज्ये व २७ जिल्ह्यातून ही पदयात्रा मार्गक्रमण करत पदयात्रेचे अर्धे अंतर पार केलेले आहे. पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होत आहे. लोकांमध्ये राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेबद्दल मोठा उत्साह दिसून येत आहे. काँग्रेसचे समर्थकच नाही तर विरोधकही या पदयात्रेला पाठिंबा देत आहेत. भारतीय जनता पक्ष व आरएसएसच्या विचारधारेच्या विरोधात देशभर एकच पक्ष सामना करू शकतो तो म्हणजे काँग्रेस पक्ष आणि त्यामुळे जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.