महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : पुढच्या महिन्यात खासगी शाळांची पटपडताळणी - nanded eduction

हे आदेश धडकल्यानंतर शिक्षण विभागाने पटपडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षकांमध्ये मात्र चलबिचल सुरू झाली आहे.

नांदेड जिल्हा परिषद

By

Published : Aug 27, 2019, 10:36 AM IST

नांदेड - जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या खासगी शाळांची पुढच्या महिन्यात पटपडताळणी होणार आहे. राज्याच्या शिक्षण सचिवाच्या सुचनेनुसार होणाऱ्या या पटपडताळणीमुळे शिक्षकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात तब्बल ४५० प्राथमिक शाळा आहेत. हजारो शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. बोगस पटसंख्या दाखवून शिक्षकांची पदे मिळवायची त्यातून आर्थिक लाभ घ्यायचा, असा प्रकार नांदेड जिल्ह्यात सर्रास घडत होता. २००४ मध्ये नांदेड जिल्ह्यातील चित्र लक्षात आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी महसूल विभागाच्या मदतीने एकाच दिवशी पटपडताळणीचा निर्णय घेतला.

वाचा - सुरेखा राठोड खून प्रकरणाचा तपास कासवगतीने; कुटुंबीयांचा आरोप

या तपासणीनंतर अनेक संस्थांमधील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर उघडे पडले. डॉ. परदेशी यांचा हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आणि शिक्षण विभागातील अनागोंदी उघडी पडली. त्यानंतर दोन तीन वर्षे गैरव्यवहाराला आळा बसला होता. परंतु, अनेक जिल्ह्यात पुन्हा गैरप्रकार सुरू झाले. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ३९५ शिक्षकांना नियमबाह्य नेमणुका देण्यात आल्या.

सखोल चौकशीतून ही बाब समोर आल्यानंतर आता संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे अस्त्र उपसण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातही तत्कालीन तीन शिक्षण अधिकाऱ्यांना नियमबाह्य नेमणुका दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नांदेड जिल्ह्यात शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी थेट मंत्रालयात गेल्या. काही प्रकरणे उच्च न्यायालयात दाखल झाली. वाढत्या तक्रारीनंतर राज्याच्या शिक्षण सचिवांनी नांदेड जिल्ह्यात पुन्हा पटपडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा - नांदेड जिल्ह्यातील 37 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

हे आदेश धडकल्यानंतर शिक्षण विभागाने पटपडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातल्या १६ तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनस्त विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांची माहिती पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या या पटपडताळणीतून काय साध्य होते, हे आगामी काळात स्पष्ट होणार असले, तरी शिक्षकांमध्ये मात्र चलबिचल सुरू झाली आहे. खरे तर गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन आहे. असे असताना पटपडताळणीचा घाट कशासाठी? असा सवाल संघटना विचारू लागल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details