नांदेड- कंधार शहरातील महाराणा प्रताप चौकात ४८ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी एका फळविक्रेत्या महिलेला सापडली. त्या महिलेने ही अंगठी संबंधितांना परत करून प्रामाणिकपणा दाखवून दिला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक तालुक्यामधून होत आहे.
लोहा तालुक्यातील चोंडी येथील सुधाकर दवळे हे लाठी (खुर्द) येथे आपल्या मेहुण्याच्या येथे शाल अंगठीच्या आयोजित कार्यक्रमासाठी जात होते. त्यांनी महाराणा प्रताप चौक येथे एक अंगठी खरेदी केली आणि लगबगीने ते दुचाकीवरून लाठी (खुर्द) कडे निघाले. परंतु, खिशातील रुमाल काढताना महाराणा प्रताप चौकात दोन अंगठ्यांपैकी एक अंगठी पडली. तिथे काही वेळानंतर फळं विक्री करणाऱ्या निर्मलाबाई कांबळे आल्या. त्यांच्या नजरेस ती दिसली. तेव्हा त्यांनी ती अंगठी घेतली.
काही वेळाने अंगठी गहाळ झाल्याचे लक्षात येताच ढवळे यांनी शोधाशोध सुरू केली. ते महाराणा चौकात अंगठी शोधत असल्याचे निर्मलाबाई यांच्या निदर्शनात आले. तेव्हा त्यांनी अंगठी ढवळे यांचीच आहे की नाही, याची खातरजमा करून घेतली. खात्री होताच त्यांनी ती अंगठी ढवळे यांना परत केली.