महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार गारपीट, पिकांच्या नुकसानीसह जनावरे दगावली - Heavy rains in Nanded

नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार गारपीट

By

Published : Oct 7, 2019, 9:27 AM IST

नांदेड -जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पुरते वैतागून टाकले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस, वादळीवारा व गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले. वीज पडल्यामुळे हदगाव तालुक्यातील पाच मजूर जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज कोसळून दहा जनावरांचा मृत्यू झाला.

हेही वाचा -बुलडाण्यात गारपीटीने पिकांचे नुकसान; शेतकरी हतबल

नांदेड जिल्ह्यात रविवारी पावसाने थैमान घातले. विजांच्या कोसळण्यामुळे हदगाव तालुक्यातील आष्टी येथील शेतावर काम करणारे मजूर जखमी झाले. दोघांची प्रकृती गंभीर आहे. यात अंकुश ठोबरे, पुष्पा ठोबरे, धुरपताबाई कोठेपल्लू, मीरा हजकुलकर, सय्यद हजरा हे जखमी झाले.

उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील शेतकरी नारायण मुटकुलवार यांच्या शेतामध्ये वीज पडल्यामुळे त्यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला. देगलूर तालुक्यातील कोकलेगाव येथील शेतकरी शंकर पाटील यांच्या दोन गायी व दोन म्हैशी मृत झाल्या. शिळवणी येथील प्रकाश देशमुख यांची एक म्हैस, तर माळेगाव येथील ज्ञानेश्वर डुमणे यांच्या दोन गायींचा मृत्यू झाला. अर्धापूर तालुक्यातील शेतकरी रामराव धात्रक यांच्या एका म्हैशीचा मृत्यू झाला.

हेही वाचा -परतीच्या पावसाने दुष्काळी भागाला झोडपले,अग्रणी नदीचे पाणी पात्राबाहेर

नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. रविवारी दुपारी विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात सध्या सोयाबीनचे पीक कापणीला आले आहे. कापूसही वेचणीला आल्याची स्थिती आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात पाऊस गायब होता. पण शेतकऱ्यांनी कसे-बसे करून कष्टाने पीक आणले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः हैराण करून सोडले आहे. सोयाबीन कापणीसाठी येऊनसुद्धा पावसामुळे कापणी करता येत नाही, त्यामुळे त्याची नासाडी होत आहे. रविवारीही वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा बरसल्या. अर्धापूर तालुक्यातील जांभरून, दाभड, बामणीसह अनेक शिवारात गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतातील पिकांची भरपूर नासाडी झाली. यात केळी, ऊस, सोयाबीन, कापूस, हळद,ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details