नांदेड- जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात व परिसरात सोमवारी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तर परिसरातील केळी, गहू, हळद, ज्वारी व पपई पिकांचे मोठ्या प्रमाणावार नुकसान झाले आहे.
अर्धापूर परिसरातील शेणी, लहान, लोणी, चाभरा, कारवाडी, निमगाव व चिचबन परिसरात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटसह तुफान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी पाण्याच्या कमतरतेमुळे केळीची लागवड कमी झाली आहे. त्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे.