नांदेड- लॉकडाऊनमुळे पोटगी मिळण्यास पीडित महिलांना अडचणी येत आहेत. त्यामुळे नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश स्वाती चव्हाण यांनी पीडित महिलांना धान्य देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पीडित महिलांना सरकारकडून मोफत जीवनावश्यक धान्याचे वाटप करण्यात येत आहे.
पोटगी न मिळाल्यामुळे अडचणीत आलेल्या महिलांना धान्य वाटप... हेही वाचा-पश्चिम बंगालमध्ये 'रेड झोन' परिसरात जमावाचा पोलिसांवर हल्ला
लॉकडाऊनमध्ये घटस्फोटीत महिलांना पोटगी मिळण्यास अडचणी येत आहेत. याप्रकरणी माणुसकीच्या नात्याने कौटुंबिक न्यायालयाने स्वतः दखल घेत त्यांना धान्य वाटप करावे असे सांगितले होते. पोटगी देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. पतीने मंजूर झालेली पोटगीची रक्कम कौटुंबिक न्यायालयात जमा करायची असते. त्यांनंतर पत्नीने न्यायालयात स्वतः येऊन ही पोटगीची रक्कम घेऊन जायची अशी ही पद्धत आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे न्यायालयात येण्यासाठी पती-पत्नी दोघांनाही अडचणी येत होत्या. त्यातून पीडित महिलांची उपासमार होऊ शकते हे लक्षात घेऊन नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयाने या पीडित महिलांना धान्य पुरवावे, असे आदेश कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले होते.
जिल्हा पुरवठा विभागाकडून तातडीने अंमलबजावणी करण्यात आली असून धान्याचे वाटप सुरू झाले आहे. या धान्यामुळे पीडित महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. कौटुंबिक न्यायालयाचे वकील अभय दांडगे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.