नांदेड - देशातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षण करण्याची ताकद केवळ भारतीय राज्यघटनेत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदान नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात बोलत होते.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडल्यानंतर नांदेड पोलीस दलाच्या वतीने पालकमंत्री अशोक चव्हाण यांना मानवंदना देण्यात आली.
कोरोना काळात सेवा देणाऱ्यांचे केले अभिनंदन
यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले, कोरोना काळात विविध क्षेत्रातील ज्यांनी प्रामाणिक काम केले. सेवा बजावली त्या सर्वांचे अभिनंदन करतो. 2020 चा काळ अत्यंत कठीण होता. कोरोना संपला असे म्हणता येणार नाही. पण, या महामारीत उंचावण्यासाठी नांदेडकरांनी आपले योगदान दिले आहे. आगामी काळात जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील समृद्धी महामार्गाला नांदेड जोडण्यात आल्याने नांदेडच्या विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. समृद्धी महमार्गाच्या नव्या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. एक हजार कोटींहून जास्त रुपये खर्चून हा रस्ता तयार केला जाणार आहे.