नांदेड - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या एका कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबावर खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्यावरून दोन गटात हाणामारी झाली आहे. हाणामारीत तीन जण जखमी झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला प्रथम यवतमाळ व नंतर सावंगी मेघे येथील मेघे हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
माहूर शहरात शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वार्ड क्रमांक १३ मधील मारुती मंदिराजवळ मारहाणीची घटना घडली होती. त्यानंतर दुपारी एक ते दोनच्या दरम्यान शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन जोगाराम राठोड (नाईक), सोनू उर्फ आशिष चारभाई, पवन शर्मा, शक्ती ठाकूर अविनाश मोहन राठोड अक्षय परस्कर संदीप हुसे, व इतर २० ते २५ लोकांच्या जमावाने सर्फराज दोसानी यांच्या मालकीच्या न्यू माहेर कलेक्शन या कापड दुकानात हातात घण लाठ्या, काठ्या, लोखंडी रॉड, घेऊन घुसून दुकातील माल लुटण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम लुटून नेली. यात दोन ते अडीच लाख रुपये होते, असा आरोप दोसानी यांनी केला आहे.