नांदेड -कोविड-१९ उपचारादरम्यान लाइफ सेव्हिंग ड्रग म्हणून स्टेरॉइडचा वापर काही अतिगंभीर रुग्णांवर करावा लागतो. मात्र त्याचा विपरीत परिणाम रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होवून अशा रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस बळावतो. रुग्ण जर मधुमेही असेल तर धोका अधिक असतो. त्यामुळे कोविड बरा झाल्यावर याबाबतीतही काळजी घ्यावी, असे आवाहन दंतरोग तज्ज्ञ डॉ. रुपाली माने यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना केले आहे.
'कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना म्यूकॉरमायकोसिसची भीती'
काय आहे म्युकोरमायकोसिस ?
हे एक फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य आजार) असून तो प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अवयव प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांमध्ये आढळणारा अतिशय दुर्मीळ असा आजार आहे. ज्याला ब्लॅक फंगस असेही म्हटले जाते. हा संसर्गजन्य म्हणजे एकापासून दुसऱ्याला लागण करणारा आजार नाही. डायबेटीस, उच्च रक्तदाब, किडनी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट झालेल्या रुग्णांना याचा सर्वाधीक धोका असतो. हा बुरशीजन्य आजार श्वासाद्वारे नेझल, पॅरानेझल सायनस व फुफ्फुसांत प्रवेश करतो, तसेच जखमांमधूनही शरीरात प्रवेश करतो. सायनस कॅविटीमधल्या लायनिंग्जला सूज येणे ज्याला आपण सायनुसायटीस असे म्हणतो, इथे सुरुवात होते. हे फंगल इन्फेक्शन रक्तपुरवठा जास्त असलेल्या भागांमध्ये लवकर पसरते, रक्तवाहिन्या ब्लॉक करते, ज्यामुळे हाडाचे नेक्रोसिस होऊन हाड निर्जीव बनते.
लक्षणे
● तोंडाच्या एका बाजूला सूज येणे.
● हिरड्यांमधून रक्त/पू (पस) येणे.
● अचानक दात हालायला लागणे.
● जबड्याचे हाड उघडे पडणे.
● डोके दुखणे.
● डोळ्यांवर सूज येणे.
● डोळ्यांची हालचाल कमी होणे.
● चेहऱ्याची त्वचा काळी पडणे.
● सायनसमध्ये रक्तसंचय होणे.
● नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे.
● कानांमध्ये डल पेन होणे.
● डोळ्यांची दृष्टी कमी होणे/ अंधत्व येणे.
निदान/तपासण्या
प्राथमिक पातळीवर या आजाराचे जेवढे लवकर निदान होईल, तेवढे आपण लवकर उपचार सुरू करून रुग्णाच्या जीविताची हमी देऊ शकतो.
● सिटी स्कॅन- सिटी पिएनएस, सिटी ऑर्बिट, सिटी ब्रेन, इत्यादी
● इंडोस्कोपी/बायोप्सी.
● फंगल कल्चर, एग्झामिनेशन - केओएच, इत्यादी तपासण्या करून त्वरित निदान करणे.
उपचारपद्धती
● लवकरात लवकर निदान करून ॲन्टिफंगल थेरेपी सुरू करणे. या आजारात मल्टिडिसिप्लिनरी ॲप्रोच लागतो, म्हणजे इएनटी सर्जन, ओरल सर्जन, आयसियू युनिट, पोस्ट ऑपरेटिव रिहॅबिलेशन, इत्यादी
● ऑपरेशन करून खराब झालेल्या हाडाचा भाग काढून टाकावा लागणे, जंतुसंसर्ग डोळ्यांत पसरल्यास पूर्ण डोळा काढून टाकणे हाही उपचार आहे.
● उपचारास विलंब लागल्यास दृष्टी जाऊ शकते, नाक व जबड्याच्या हाडावर दुष्परिणाम होतो. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यास मृत्यूची शक्यता पन्नास टक्के असते. असा सिडीसी (सेंटर ऑफ डिसिझ कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेन्शन) यांचा अहवाल आहे.
काय बाळगावी सावधगीरी ?
● अशी लक्षणे आढळून आल्यास लगेच तज्ज्ञ डॉक्टर्स जसे की, कान, नाक, घसा तज्ज्ञ/डेंटल सर्जन/नेत्ररोग तज्ज्ञ यांचा सल्ला घेवून पुढील उपचार सुरू करावेत.
● हे उपचार खर्चिक आहेत पण मोठ्या शहरांमध्ये जसे की पुणे, मुंबई, हैद्राबाद येथे यांचे खास 'म्युकोरमायकोसिस क्लिनिक'सुद्धा आहेत, जिथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे.
● शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे, निरोगी जीवनशैली अवलंबणे.
● रस्त्याचे खोदकाम किंवा ओल्या मातीचे खोदकाम अशा ठिकाणी जाणे टाळावे, कारण ही बुरशी निसर्गातूनच आढळून येते. फ्रिजमध्ये खूप दिवसांचे अन्न जमा करणे अशा गोष्टी टाळाव्या, भिजलेले लाकूड किंवा बुरशी आलेले ओले फर्निचर घरातून काढून टाकावे.
● मास्क लावणे, सॅनिटायझेशन करणे या गोष्टीही नियमित सुरू राहू द्याव्या.
हेही वाचा -महाराष्ट्र दिनानिमित्त लसीकरणाचा मुहूर्त.. १८ ते ४४ वयोगटापर्यंतच्या व्यक्तींना मिळणार लस