नांदेड - शहरापासून जवळ असलेल्या विष्णुपुरी येथील एका वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह त्याच शिवारात आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शेतीच्या वादातून दिलेल्या त्रासामुळे या शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी केली. या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलिसांनी ७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बालाजी वामनराव पावडे (वय ६९), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
विष्णुपुरी शिवारात बालाजी पावडे हे शेतकरी मृतावस्थेत आढळून आले. याबाबत शिवाजी हंबरडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. परंतु ही घटना उघडकीस आल्यावर मुलगा सुनील पावडे यांनी बालाजी यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
हेही वाचा -दैव बलवत्तर म्हणून वाचले पन्नास भाविकांचे प्राण!
आपल्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याची त्यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार, मृत बालाजी यांना त्यांच्या वाट्याची शेती त्यांच्या नावावर करू न देता शेतात जाऊन त्यांचे औत काही जणांनी अडविले, पेरणी थांबवली, शेतातील बोअरवेलमध्ये दगड टाकले, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. नारायण हंबर्डे, संतोष नारायण रा. गुंडेगाव, कमलबाई पावडे, सीमा पावडे, माधव पावडे रा. विष्णुपुरी, नारायण मोरे, बालाजी मोरे रा. टेळकी लोहा यांनी त्रास बालाजी यांना विविध प्रकारे दिला होता. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार सुनील यांनी दिली. त्यावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांनी उपरोक्त ७ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर, उपनिरीक्षक जावेद शेख पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा - ऊस तोडणी मशीन बिघडल्यानंतर ते शेतातच जळून खाक