नांदेड - घराला लागलेल्या आगीत सापडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे घडली आहे. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्याचे समजते. एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू - FIRE
आग लागली त्यावेळी घरातील सर्वजण गाढ झोपेत असल्याने काही कळायच्या आतच ते आगीच्या कह्यात सापडले होते.
मुक्रमाबाद येथील माळरानावर लाकडी बांबू आणि पत्र्याच्या सहाय्याने तयार केलेल्या घरात पवार कुटुंब राहत होते. या घराला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली. घराला चारही बाजुंनी लाकडाचे आणि गवताच्या कुडाने वेढले असल्याने या आगीने मोठा पेट घेतला. आग लागली त्यावेळी घरातील सर्वजण गाढ झोपेत असल्याने काही कळायच्या आतच ते आगीच्या कह्यात सापडले होते.
या आगीत व्यकंट पवार (वय ३९), त्यांची पत्नी रेखा (वय ३२), मुलगी काजल (वय ८) या तिघांचा मृत्यू झाला. तर, करण हा १२ वर्षीय मुलगा वाचला आहे. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पण, या प्रकारमुळे मुक्रमाबाद परिसरात शोककळा पसरली आहे.