नांदेड- यंदा जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. परिणामी, धरण लाभक्षेत्रात मूग व केळीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. पाणीसाठा पर्याप्त असल्याने जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
पाण्याची शाश्वती असल्याने मूग, सोयाबीननंतर कांदे बाग केळीची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. मराठवाड्यामध्ये केळी लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार हेक्टर आहे. तर, उत्पादकता ६१.२३ टन प्रतिहेक्टर एवढी आहे. मराठवाडा विभागातील ८ जिल्ह्यांपैकी नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात प्रामुख्याने केळीची लागवड केली जाते. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड, हदगाव, भोकर या तालुक्यांमध्ये गतवर्षी ७ हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली होती. यंदा ८ हजार हेक्टरवर नवीन लागवड प्रस्तावित आहे.