नांदेड - अशोकराव यांना मोठी पदे मिळुनही विकास करू शकले नाहीत. चव्हाणांकडे रॉकेल, पेट्रोलपासून ते मोटारसायकलपर्यंत डीलरशिप असून ते 'लीडर' नाहीतर 'डीलर' आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नांदेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह युतीचे मोठे नेते उपस्थित होते.
मराठवाड्यात रेल्वेची १३ हजार कोटींची कामे सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात रस्त्याची ८ हजार ५०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. लेंडीसारखे प्रकल्पाचे काम सुरू असून सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागत आहेत. १२०० कोटी रुपयांचा विमा मिळाला असून केंद्र सरकारने संकटकाळी मराठवाड्याला मदत केल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका करताना त्यांना डिलर म्हणून उल्लेख केला. यावेळी लीडर म्हणून निवडून आणण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या रूपाने सक्षम उमेदवार दिल्याचे ते म्हणाले. २०१४ मध्ये नांदेडचा विजय थोडक्यातून गेला. मात्र, यावेळी नांदेडमध्येही मोदी सरकार येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.