नांदेड- लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून घरात राहणे अनेकांना कंटाळवाणे झालेले आहे. मात्र, याच काळाचा सदुपयोग करीत एका बाप-लेकाने ५ दिवसात १६ फूट विहीर खोदली. या विहिरीला चांगले पाणी लागण्याने पिण्याच्या पाण्याची समस्या मिटल्याने, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेल्या मुळझरा गावातील सिद्धार्थ देवके आणि त्याचा मुलगा पंकज यांनी ही अफलातून कामगिरी केली आहे.
मुळझरा हे दुर्गम गाव म्हणून ओळखला जातो. या गावात सिद्धार्थ देवके आपल्या कुटुंबासह राहतात. त्याचा बँडबाजाचा व्यवसाय आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे लोकं मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न उरकत आहेत. त्यामुळे सिद्धार्थ यांच्याकडे लॉकडाऊनमध्ये काही काम नव्हते. तेव्हा त्यांनी दरवर्षी पाण्यासाठी होणारी भटकंतीचा विचार करून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला.
सिद्धार्थ यांनी त्यांच्या घरासमोरील अंगणात विहीर खोदण्याचे ठरवले आणि कामाला सुरुवात केली. या कामी त्यांना त्यांचा मुलगा पंकज याने साथ दिली. दोघे दिवस उजाडला की दिवसभर विहीर खोदायचे. हा नित्यक्रम पाच दिवस चालला. पाचव्या दिवशी सिद्धार्थ आणि पंकज यांच्या कष्टाचे चीज झाले. विहिरीला पाणी लागलं. तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कारण त्यांनी पाण्याच्या टंचाईवर कायमची मात केली.