मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची मुंबई हॉटस्पॉट बनली आहे. कोरोनाची लागण झाल्याने रुग्णाला आणि त्यांच्या परिवाराला त्रास सहन करावा लागेल या भीतीने अनेक रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अशाच एका रुग्णाने मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयात आत्महत्तेचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबईत कोरोनाचे रोज हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर पालिकेच्या, खासगी रुग्णालयात तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. पालिकेचे वांद्रे येथे भाभा रुग्णालय आहे. या रुग्णालयात 18 जूनला एका 54 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी भरती करण्यात आले होते. हा रूग्ण मानसिक तणावाखाली होता. त्याच तणावाखाली त्याने शनिवारी 19 जूनला रूग्णालयाच्या वॉशरूममध्ये जाऊन त्याने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
आत्महत्या करण्यासाठी त्याने वॉशरूममधीलच एका हत्याराचा वापर केला. त्यावेळी या रुग्णाला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात आले. त्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भाभा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली.