नांदेड -काँग्रेस-राष्ट्रवादीकाँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे. या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा आज नांदेडमध्ये आयोजित केली आहे. या सभेस काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटकपक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या प्रचार सभेसाठी नेत्यांची मांदीयाळी
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची उपस्थिती. पुढील सभा २३ फेब्रुवारीला परळीत होणार.
नांदेड येथील इंदिरा गांधी मैदानावर सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या सभेत महाराष्ट्राचेप्रभारी मल्लीकार्जून खरगे,राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे अध्यक्ष शरद पवार,पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,गुजरात काँग्रेसचे प्रभारी राजीव सातव,माजी मंत्री रोहिदास पाटील,माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार,माजी मंत्री कमलकिशोर कदम,माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर,माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर,माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
या सभेची नांदेडमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेनंतर २३ फेब्रुवारीला परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अशाच पध्दतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही महाआघाडीची संयुक्त प्रचार सभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे. नांदेड येथे होणार्या या सभेस काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून करण्यात आले आहे.