महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अशोका'चे झाड कुणाला सावली देत नाही, म्हणून नांदेडकरांनी नवीन झाड लावले - मुख्यमंत्री - Congress leader Ashok Chavan

नांदेड जिल्ह्यातील मोंढा येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. गेल्या ५ वर्षांत राज्यात भाजप-सेनेने केलेली कामे सांगण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका

By

Published : Aug 31, 2019, 12:42 PM IST

Updated : Aug 31, 2019, 3:09 PM IST

नांदेड -लोकसभा निवडणुकीत नांदेडकरांनी इतिहास घडवला. अशोकाचे झाड कोणाला सावली देत नाही. त्यामुळे लोकांनी नवी सावली दिली आहे. अशा शब्दात भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना टोला लगावला. नांदेड येथील नवा मोंढा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांची काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका

हेही वाचा - आठवलेंचे छगन भुजबळांना आमंत्रण.. म्हणतात शिवसेनेत न जाता आरपीआयमध्ये यावे

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने केलेली कामे सांगण्यासाठी आणि आमचे दैवत असलेल्या जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. भाजपची परंपरा सांगताना ते म्हणाले की, आम्ही विरोधात असलो की संघर्षयात्रा काढतो आणि सत्तेत असलो की संवादयात्रा काढतो. आमच्या यात्रेला लोकांचा अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. या उलट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या यात्रेची काय अवस्था आहे, आम्हाला मैदान पुरत नाही, त्यांना मात्र मंगल कार्यालयात सभा घ्यावी लागते.

सत्तेची मुजोरी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना १५ वर्षे सत्ता भोगूनही जनतेचा विसर पडला आहे. मात्र, अजूनही ते सुधारले नाहीत. आपल्या अपयशाचे खापर ते ईव्हीएम मशिनवर फोडत आहेत. २००४ ते २०१४ या काळात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनचाच वापर करण्यात आला. त्यावेळी तेच निवडून आले. तेव्हा ईव्हीएम मशिन चांगल्या होत्या काय? सुप्रिया सुळे निवडून आल्या की ईव्हीएम मशिन चांगल्या आणि प्रतापराव निवडून आले की वाईट, असा दुजाभाव का? असा सवालही त्यांनी केला. बिघाड ईव्हीएम मशिनमध्ये नाही, तर तुमच्या खोपडीत आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीची तुलना मुख्यमंत्र्यांनी नापास विद्यार्थ्यांशी केली. यासाठी त्यांनी वर्गातल्या बुद्ध विद्यार्थ्यांचे उदाहरण दिले. अभ्यास करायचा नाही, मेहनत घ्यायची नाही आणि नापास झाले की त्याचा दोष पेनला द्यायचा, असाच काहीसा प्रकार त्यांच्या बाबतीत असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - पुणे : गणेशोत्सवात शेवटचे 6 दिवस रात्री 12 पर्यंत देखावे राहणार सुरू - चंद्रकांत पाटील

सगळीच कामे केली असा आमचा दावा नाही. मात्र, त्यांची १५ वर्षे आणि आमची पाच वर्षे याची तुलना करा. नक्कीच त्यांच्यापेक्षाही दुप्पट काम केली आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या काळात बाराशे कोटी दिले गेले. आम्ही दहा हजार कोटी दिले. कर्जमाफी, दुष्काळ, अतिवृष्टी अशा सर्व अडचणीच्या प्रसंगात आम्ही शेतकऱ्यांसोबत राहिलो, असे फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले. चिंता करू नका, विमा कंपन्यांना सरळ करून यंदाचे पीकविम्याचे पैसेही दिले जातील, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

हेही वाचा - भाजपकडून राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागांसाठी चाचपणी सुरू - सुधीर मुनगंटीवार

मराठवाड्यात वर्षानुवर्षे दुष्काळ राहिला आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार आणि जलसिंचनाची कामे करूनही फरक पडत नाही. आता पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. मराठवाड्यात वॉटर ग्रीडची योजना राबवून सगळी धरणे पाईपलाईने जोडण्यात येतील. तसेच ६४ हजार किमीची पाईपलाईन टाकून गावागावातील लोकांना फिल्टरचे शुद्ध पाणी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री सडक योजनेतून ३० हजार किमीचे रस्ते करण्यात आले. २० हजार किमी लांबीची राष्ट्रीय महामार्गाची कामे, तर १० हजार कि.मी लांबीची राज्य मार्गांची कामे सरकारने केली आहेत. राज्यातील १८ हजार गावांना पिण्याचे पाणी, पंतप्रधान घरकुल योजनेतून गरीब व सामान्य कुटुंबातील लोकांना घरे दिली. गावरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, रोजगार या क्षेत्रातही सरकारने भरीव काम केले आहे. उद्योगाच्या क्षेत्रातही महाराष्ट्र नं .१ वर आहे. आरोग्य योजनांमुळे गरीबांना ऑपरेशन सोपे झाले आहे. एकूणच राज्यातील भाजप - शिवसेना महायुतीचे सरकार सामान्य आणि गरीबांचे सरकार असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. यावेळी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार, प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Last Updated : Aug 31, 2019, 3:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details