महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता; अंतिम पैसेवारी जाहीर - शेती

जिल्ह्यातील एकूण १ हजार ५६२ गावांतील ७ लाख ६६ हजार ६०५ हेक्टर लागवडी लायक क्षेत्रापैकी ७ लाख २० हजार १०६ हेक्टरवर पेरणी झालेल्या पिकांची कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून अंतिम पैसेवारी निश्चित करण्यात आली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे.

nanded
अंतिम पैसेवारी जाहीर

By

Published : Dec 20, 2019, 11:29 AM IST

नांदेड - खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर करून विभागीय आयुक्तांना सादर केली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यापूर्वी प्राथमिक नजरअंदाज पैसेवारी, तसेच सुधारीत पैसेवारीत जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशांच्यावर जाहीर झाली होती. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते. तर, आता अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या खाली जाहीर झाल्याने यंदा पीकविमा मंजूर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यात पीक विमा मिळण्याची शक्यता

राज्यातील कृषी उत्पादनाचा निकष निर्धारित करण्यासाठी राज्यात पीक पैसेवारी पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यात शासनाच्या कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून पिकांची पैसेवारी निश्चित करण्यात येते. शासन आदेशानुसार निर्धारित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाने ३० सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले होते. यात सर्व १६ तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या वर जाहीर करण्यात आली. यानंतर शासन नियमानुसार सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. यातही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या वर असल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविले होते. दरम्यान, यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राजकीय, तसेच शेतकरी संघटनांकडून पैसेवारी ५० पैशांच्या आत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते.

जिल्हा प्रशासनाने १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली जाहीर करून विभागीय आयुक्तांना कळविले आहे. त्यामुळे यंदा खरीप पीकविमा मंजूर होइल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ५६२ गावांतील ७ लाख ६६ हजार ६०५ हेक्टर लागवडी लायक क्षेत्रापैकी ७ लाख २० हजार १०६ हेक्टरवर पेरणी झालेल्या पिकांची कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त पीक कापणी प्रकल्पातून अंतिम पैसेवारी निश्चित करण्यात आली. यात सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा - अर्धापुरात नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात मोर्चा व कायद्याची होळी

तीन टप्प्यात पैसेवारी -
दरवर्षी हंगामी पैसेवारी ३० सप्टेंबर, सुधारीत पैसेवारी ३१ ऑक्टोबर तर, अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन जाहीर करते. शासनाच्या ३ नोव्हेंबर २०१५ च्या आदेशानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारी पद्धतीचा आधार घेतला जातो.

तालुकानिहाय अंतिम पैसेवारी (पैशात)
नांदेड - ४४, अर्धापूर - ४८, कंधार - ४८, लोहा - ४८, भोकर - ४८, मुदखेड - ४७, हदगाव - ४८, हिमायतनगर - ४७, किनवट - ४७, माहूर - ४७, देगलूर - ४७, मुखेड - ४७, बिलोली - ४८, नायगाव - ४८, धर्माबाद - ४८, उमरी - ४७

हेही वाचा -नांदेड: वाढत्या प्रवाशांमुळे जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये २६ विशेष रेल्वेगाड्या

ABOUT THE AUTHOR

...view details