नांदेड - विवाहितेचा अघोरी छळ करून मानसिक आणि शारीरिक त्रास देणाऱ्या सासरच्या ५ जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
संतापजनक! नांदेडमध्ये विवाहितेचा अघोरी छळ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - विवाहिता
नांदेडमध्ये विवाहितेचा अघोरी छळ करून मानसिक आणि शारीरिक त्रास देणाऱ्या सासरच्या ५ जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील बरबडा येथील एका विवाहितेला संजय, शारदाबाई नारायण, नारायण गोपाळ, शिवाजी नारायण , सरस्वती शिवाजी यांनी संगनमत करून माहेराहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. बेल्टने मारून जखमी केले. शिवीगाळ करून पैशासाठी क्रूर वागणूक दिली. तसेच पतीने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून सतत अनैसर्गिक अत्याचार केला. मुलगाच पाहिजे म्हणून बरबडा, लातूर, तामसा, हदगाव आणि नवी मुंबई येथे नेऊन मांत्रिकाकडून अघोरी उपचार केले, असा आरोप या विवाहितेने पतीवर केला आहे.
नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे तू वागत जा, असा दबावही शारजाबाईने सतत आणला, अशी तक्रार पीडितेने दिली. हे प्रकार ३० डिसेंबर २०१७ रोजी लग्न झाल्यानंतर एका महिन्यापासून ५ जून १९ पर्यंत सुरू होते. याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी पाचही जणांविरुद्ध कलम ४९८ अ, ३२४, ५०४, २९४, ३७७, ५०६,३४, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ ई, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा २०१३ कलम २ (ख), ३(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे करत आहेत.