नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येत्या ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये संवाद मेळावा घेणार आहेत. तेलंगणाबाहेर त्यांचा हा पहिलाच मेळावा असेल. याची जय्यत तयारी सुरू आहे. बीआरएसच्या नेत्यांनी नांदेडमध्ये आजी, माजी लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले जात आहे. मागील आठवड्यापासून तेलंगणातील विद्यमानसह माजी लोकप्रतिनिधी नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री केसीआर यांच्या संवाद मेळाव्याची जागा गुरुद्वारा मैदानावर निश्चित झाली आहे. या वेळी अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यानंतर पक्षाची जिल्हा, विभाग व राज्याची कार्यकारिणी ठरणार आहे, असे संयोजकांनी सांगितले. मुख्यमंत्री केसीआर यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी सीमावर्ती तालुक्यांमध्ये बैठका सुरू आहेत.
तेलगू भाषिकांची संख्याही मोठी :बिलोली, देगलूर, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर हे तालुके तेलंगणाच्या सीमेला जोडलेले आहेत. या तालुक्यांमध्ये तेलगू भाषिकांची संख्याही मोठी आहे. त्यांचे रोजचे जाणे-येणे तेलंगणात आहे. तेलंगणातील सोयी-सुविधांकडे आकर्षित होऊन सीमेलगतची बहुतांश गावे तेलंगणात जाण्यासाठी इच्छुक आहेत. हाच धागा पकडून बीआरएसने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. काही सीमावर्ती तालुक्यात बैठकाही सुरू आहेत. या माध्यमातून वातावरणनिर्मिती केली जात आहे. तसेच मागील आठवड्यापासून तेलंगणातील विद्यमानसह माजी लोकप्रतिनिधी तळ ठोकून आहेत. याशिवाय मंत्र्यांचे दौरेही वाढले आहेत.