नांदेड - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. केंद्र व राज्य सरकारवर मराठा समाजाचा रोष व्यक्त होत असून आता विविध प्रकारच्या आंदोलनासह मतदानावर बहिष्कार टाकणे सुरू आहे. जिल्ह्यात 1हजार 15 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सुगाव बु. (ता. नांदेड) येथील मराठा समाजाने ग्रामपंचायत निवडणूकीसह येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सुगाव येथील मराठा समाजाचा मतदानावर बहिष्कार......! जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन -
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकार कोणाचे ही असो गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. महाराष्ट्रात विदर्भ, खानदेश तसेच इतर ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण आहे. तेथील मराठा समाज ओबीसी मध्ये आहे. उर्वरीत राहिलेल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला नौकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळावे म्हणून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले गेले आहे. अनेक मोर्चे निघाले, राज्यातील हजारो मराठा युवकांवर केसेस ही दाखल झाल्या आहेत.
कॉल येऊनही जॉईन होता येत नाही -
त्याचबरोबर शासनाने दिलेल्या एसईबीसी आरक्षणानुसार अनेक मुलांना नौकरीचे कॉल आले आहेत. मात्र, सुप्रिम कोर्टाच्या स्थगितीमुळे ज्वाईन करून घेतले जात नाही आहे. मुलांची मनस्थीती बिघडत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्या शेकडो मराठा समाज बांधवानी आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. अद्याप आम्हाला आरक्षण देण्यात आले नाही उलट सर्व पक्षीयांकडून राजकारणच केले जात असल्याचे दिसत आहे.
मतदानावर बहिष्कार टाकण्यास सरकारच जबाबदार....!
सुगाव (बु.) ता.जि.नांदेड येथील सर्व मराठा समाज येत्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकांवर तसेच सर्व पक्षांवर बहिष्कार टाकणार असल्या बाबतचा ठराव सर्वानुमते घेतला आहे. तसेच असा ठराव घेणारे महाराष्ट्रातील पहिले गाव कदाचित आमचेच ठरेल. ईतर ही गावातील मराठा समाज बहिष्कार टाकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी आपण व आपलेच प्रशासन जबाबदार आहे. असल्याचा आरोप केला आहे.