नांदेड - शहरातील वाहतुकीच्या कोंडीचे प्रमुख कारण किंवा प्रवाशांसोबत हुज्जत घालणारे, असे अनेक आरोप ऑटोचालकावर होत असतात. परंतु, या आरोपांना छेद देण्याचे काम शहरातील एका ऑटो चालकाने केले आहे. महागाईच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळावा, असा उपक्रम त्याने सुरु केला आहे. 'ऑटोमध्ये प्रवास करा आणि मनात येईल तेवढेच पैसे द्या', असे ठळक अक्षरात ऑटोच्या चारही बाजूनी लिहीण्यात आलेले आहे. शहरात धावणारा त्याचा हा ऑटो चर्चेचा विषय बनला आहे.
बिनधास्त प्रवास करा, अन् मनाप्रमाणे पैसे द्या; ऑटोचालकाची अभिनव योजना
महागाईच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळावा, असा उपक्रम त्याने सुरु केला आहे. 'ऑटोमध्ये प्रवास करा आणि मनात येईल तेवढेच पैसे द्या', असे ठळक अक्षरात ऑटोच्या चारही बाजूनी लिहीण्यात आलेले आहे. शहरात धावणारा त्याचा हा ऑटो चर्चेचा विषय बनला आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने परिणामी प्रवाशी वाहतुक करणार्या वाहन धारकांनी प्रवास भाड्यात वाढ केली आहे. ऑटोमध्ये बसताच प्रवाशांना १० रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. काही वेळा, तर प्रवास भाड्यावरुन प्रवाशी आणि ऑटोचालकांचा वादही होतो. परंतु, या सर्व प्रकाराला छेद देण्याचे काम शहरातील दुल्हेशाहनगर येथील शेख अहमद शेख अनवर या ऑटोचालकाने केले आहे. शहरातील गरजु, गरीब प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी आपल्या ऑटोवर 'अपने दिलसे किराया देना', असे ठळक अक्षरात लिहून प्रवाशी आपल्या मनाने जो किराया देतील ते खुशीने स्विकारत आहेत. ऑटोचालक शेख अहमद यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर, या उपक्रमामुळे त्यांच्या ऑटोतून प्रवास करणार्यांची संख्या वाढत चालली आहे.
या उपक्रमाबद्दल ऑटोचालक शेख अहेमद यांना विचारले असता, नांदेड येथील प्रवाशी सुरुवातीपासूनच आपल्या मनानेच भाडे देतात. परंतु ठळक अक्षरात लिहून ठेवण्याचा फायदा एवढाच, की यामुळे गरजु आणि गरीब प्रवाशांना दिलासा मिळत आहे. या उपक्रमामुळे ऑटो चालविणे परवडते का? असे विचारले असता, देणारा देव आहे, या उपक्रमामुळे मजूरी मिळून जाते. उदरनिर्वाह चालतो या पेक्षा जास्त काही नको, असे सांगत आपण मागील १९ वर्षापासून नांदेड शहरात ऑटो चालवत असल्याचे शेख अहेमद यांनी सांगितले. शहरात धावणारा हा ऑटो चर्चेचा विषय बनला आहे. लोक कुतुहलाने दिलदार शेख अहेमद यांच्या ऑटोतून प्रवास करत आहेत.