नांदेड- हप्ता देण्यास नकार दिल्याने शहरातील कौठा भागात तलवारीने हल्ला करुन एका व्यापाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नांदेडमध्ये खंडणीची मागणी करत व्यापाऱ्यावर तलवार हल्ला; दोन अटकेत - नांदेडमध्ये हल्ला
नांदेड शहरातील कौठा भागात हप्ता देत नाही म्हणून तलवारीने हल्ला करून एका व्यापाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जुना कौठा परिसरातील श्रीपादनगरमध्ये श्री साई कलेक्शन हे दुकान आहे. या दुकानाचे मालक भगवानमाधव बारसे हे काल रात्री ८ वाजता आपल्या दुकानात बसले होते. तेव्हा आरोपी सिध्देश्वर उर्फ सिध्दू काळे व दिगांबर काकडे रा.जुना कौठा नांदेड अचानक दुकानात आले. त्यांनी आम्हाला अन्य दुकानदार दरमहा हप्ता देतात पण तुम्ही का हप्ता देत नाही, असे म्हणून तलवार बारसेंच्या मानेवर मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लाथाबुक्यांनी बारसे व सहकाऱ्यांना मारहाणही केली.
या प्रकरणी बारसे यांनी दिलेल्या तक्राररीवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी दिली आहे.