नांदेड - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची एका कंपनीकडून कोट्यवधीची फसवणूक झाली आहे. चेन्नईच्या एका कंपनीने विश्वासघात करून तब्बल ५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६ रुपयांचा चुना या साखर कारखान्याला लावला आहे. कागदपत्रात लपवाछपवी करून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन जणांना मुदखेडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.भांबरे यांनी चार दिवसाची(२ सप्टेंबर २०२१ पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला चेन्नईच्या कंपनीकडून कोट्यवधीचा चुना; दोघांना पोलीस कोठडी - दोन जणांना फसवणूक प्रकरणी पोलीस कोठडी
साखर विक्रीचे टेंडर तामिळनाडू राज्यातील चेन्नईच्या एका कंपनीला दिले होते. साखर निर्यात केल्यानंतर भाऊराव कारखान्याला केंद्रशासनाकडून प्रतिटन काही आर्थिक मदत मिळत असते. पण संबंधित कंपनीने मात्र निर्यात केल्याची कुठलीही कागदपत्रे न सादर करता इंडोनेशिया या देशाने तुमची साखर नाकारली असल्याचा ईमेल पाठवला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार तामिळनाडू येथील चेन्नईमध्ये राहणारा प्रदीपराज चंद्राबाबू (43), आणि अभिजित वसंतराव देशमुख (रुही ता.अहमदनगर ) या दोघांना नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अभिजित देशमुखची पोलीस कोठडी ३१ ऑगस्ट रोजी संपली आहे. यातील ब्रोकर म्हणून काम करणारा अभिजित देशमुख मागील सात दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे. बारड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ८६/२०२१ सर्वच अभिलेखातून बाहेर ठेवण्यात आले आहे.
चेन्नईच्या कंपनीने लपविली कागदपत्रे
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दिलेल्या तक्रारीनुसार भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे युनिट क्र-३ हदगाव आणि युनिट क्र-४ वाघलवाडा यांच्या साखर विक्रीचे टेंडर तामिळनाडू राज्यातील चेन्नईच्या एका कंपनीला दिले होते. साखर निर्यात केल्यानंतर भाऊराव कारखान्याला केंद्रशासनाकडून प्रतिटन काही आर्थिक मदत मिळत असते. पण संबंधित कंपनीने मात्र निर्यात केल्याची कुठलीही कागदपत्रे न सादर करता इंडोनेशिया या देशाने तुमची साखर नाकारली असल्याचा ईमेल पाठवला. पण त्यांच्याकडे अशी कुठलाही पुरावा नसल्याचे कारखान्याच्या लक्षात आले. यामुळे केंद्र शासनाकडून मिळणारी रक्कम ५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६ रुपये आता मिळणार नाही. संबंधित कंपनीने कारखान्याची फसवणूक केल्याचे लक्ष्यात आल्यानंतर दि.२२ ऑगस्ट रोजी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 86/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 406 , 420 , 467 आणि 34 नुसार दाखल झाला.
गोपनीय पद्धतीने सुरू होता तपास...!
या प्रकरणात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची ५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. साखर विक्री संदर्भाने हा प्रकार घडला आहे. साखर सरकारला विक्री करण्यात आली होती. ती सरकार कोणती या बाबत माहिती प्राप्त झाली नाही. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अत्यंत गोपनीय पध्दतीने याचा तपास सुरू होता. या दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 86 चा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे देण्यात आला आहे.
एकाला न्यायालयीन तर दोघांना पोलीस कोठडी!
आर्थिक गुन्हे शाखेने अभिजित देशमुखसह प्रदीपराज चंद्राबाबू आणि इंडिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता (रा.गंगानगर आनंदपूर आंध्रप्रदेश) अशा तिघांना मुदखेड न्यायालयात हजर केले. त्यावेळी देशमुखची पोलीस कोठडी वाढवून देण्याची आणि प्रदीपराज आणि डिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अॅड.जे.एन.वडेर यांच्यावतीने केली. न्या.भामरे यांनी अभिजित देशमुख यांना न्यायालयाने पोलीस कोठडी वाढवून न देता न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्यांच्यावतीने अँड , नवनाथ पंडित यांनी जामीन मिळावा असा अर्ज केला आहे. त्यावर सरकारी वकील अँड.जे.एन.वडेर यांनी वेळ मागितला आहे. त्यावर सुनावणी २ सप्टेंबर रोजी होणार आहे. अर्थात देशमुख आता तुरुंगात जातील, उर्वरित पकडलेले आरोपी प्रदीपराज चंद्राबाबू आणि डिगा मणी कांता उर्फ मुन्नी कांता या दोन जणांना न्या. एस.बी.भांबरे यांनी ४ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. यात मात्र कारखान्याने आणि पोलीस प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळल्यामुळे विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.