नांदेड - आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरुन मित्राची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या दिगंबर वनजे या आरोपीस बिलोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के मांडे यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. आरोपीला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
देगलूर शहरात राहणारे दिगंबर वनजे व दशरथ सूर्यवंशी हे दोघे मित्र होते. त्यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार होता. याच कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. १९ मार्च २०१६ रोजी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्याचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. दिगंबर वनजे याने दशरथ सूर्यवंशी यांच्यावर सुरुवातीला चाकूने व नंतर दगडाने हल्ला केला. त्यात दशरथचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी देगलूर पोलिसांनी दिगंबर वनजे याच्याविरुद्ध हत्या केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक बी.एस.काळे यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने या प्रकरणात एकूण ८ जणांची साक्ष नोंदवली. त्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्या. व्ही.के मांडे यांनी दिगंबर वनजे यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू अॅड. एस. बी. कुंडलवाडीकर यांनी मांडली.