नांदेड -ग्रामीण भागात अनेक सुप्त असलेल्या काही आयडीया असतात. भारी जुगाड करून येथील लोक आपले काम भागवत असतात. एका मोठ्या इंजिनिअरला मागे टाकणारी यांची कल्पकता कधी-कधी पुढे असते. जिल्ह्यातील पिंपळगाव महादेव (ता. अर्धापूर) येथील एका फुल उत्पादक शेतकऱ्याने दररोजचा पेट्रोल खर्च परवडत नसल्यामुळे काही आयडीया शोधली आहे. त्यांनी जुन्या मोटारसायकलवर प्रयोग करून चार्जिंगवर चालणारी दुचाकी बनवली आहे. यासाठी सदरील शेतकऱ्याने दोन वर्षे मेहनत घेऊन फक्त १४ रुपयांच्या खर्चामध्ये १०० किमी अंतर पार करता येईल, अशी ईलेक्ट्रिक दुचाकी बनवली आहे.
ज्ञानेश्वर उमाजीराव कल्याणकर असे या ३० वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे ते राहतात. दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमती आणि वाढते प्रदूषण या सध्याच्या काळातील मोठी समस्या बनली आहे. त्याला पर्यायी मार्ग म्हणून आजकाल लोक पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक बाईक्सचा पर्याय पुढे येत आहे. अशातच ज्ञानेश्वर यांनी पर्यावरण पूरक चार्जिंगची दुचाकी बनवली आहे. शेतातील कामे, फुले बाजारपेठेत नेणे आणि शेतात जाण्यासाठी चार्जिंग दुचाकी बनवली आहे.
फुल उत्पादक शेतकरी
पिंपळगाव शिवारात पारंपारिक पद्धतीने शेती न करता विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेत ज्ञानेश्वर आणि त्यांचे भाऊ शेती करतात. गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाउन, लग्न समारंभ आदी कार्यक्रम छोटेखानी होत आहेत. फुल शेतीतुन येण्या-जाण्याच्या खर्च निघत नसल्याने तरूण शेतकऱ्याने लॉकडाउनमध्ये चार्जिंगवरील मोटारसायकल बनवण्याचा प्रयोग करण्याचा संकल्प केला. त्याने विजेवर चालणारी मोटारसायकल तयार करण्याचे स्वप्न सत्यात उतरविले.