नांदेड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले..! - शेतकरी आत्महत्या
सततची नापिकी, कर्जबाजारीपणा यासारख्या कारणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात भर म्हणजे गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेले लॉकडाऊन. त्यामुळे गेल्या वर्षभरात नाशिक जिल्ह्यात ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
नांदेड - गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी ५७ शेतकरी कुटुंब शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर आठ कुटुंबांना जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत अपात्र ठरविण्यात आले आहे.
सततची नापिकी, कर्जबाजारी आणि कोरोनाच्या संकटाला कंटाळून संपविली जीवनयात्रा..!
सततची नापिकी, कर्जबाजारीपणा यासारख्या कारणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात भर म्हणजे गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेले लॉकडाऊन. एकूणच संकटाची मालिका असल्याने अनेक शेतकऱ्यांनी गळफास घेऊन तर काहींनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.
आतापर्यंत ५७ कुटुंब मदतीसाठी पात्र..!
फेब्रुवारी, एप्रिल, जून ऑगस्ट महिन्यात प्रत्येकी ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील ८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. जानेवारीत ७, मार्चमध्ये ५ तर जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सप्टेंबरमध्ये २ तर डिसेंबर महिन्यात आतापर्यंत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. ( दि.७ डिसेंबर पर्यंत) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इंटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाची मदत देण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत ५७ शेतकरी कुटुंबांना मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. तर आठ कुटुंबांना अपात्र ठरविण्यात आले. उर्वरित चार प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.