नांदेड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात नांदेडमध्ये वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसात वाहतूक पोलिसांनी दहा हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई केली आहेत. यात 53 लाखांचा दंडही वसुली करण्यात आला आहे.
दहा दिवसात 53 लाखांचा दंड वसूल... हेही वाचा-धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
लॉकडाऊनच्या काळात लायन्सस नसतानाही वाहन चालवणाऱ्याचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. त्यातच कुठल्याही ठोस कारणाशिवाय फिरणारे महाभाग देखील मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने अशा वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 53 लाखांचा दंडही वसुली करण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या विरोधात ही कारवाई सातत्याने चालूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, किमान या निम्मीताने तरी लोकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची शिस्त लागावी, असा या मागचा वाहतूक शाखेचा हेतू असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी सांगितले.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.