नांदेड - गेल्या काही दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या ४५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे अर्ज दाखल केले आहेत. प्राप्त अर्जानुसार शेतकऱ्यांच्या शेतात जावून अॅपच्या माध्यमातून पंचनामे सुरु असल्याची माहिती प्रशासनासह विमा कंपनीकडून मिळाली आहे. दरम्यान, काही ठिकाणी पाऊस सुरुच असल्याने नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात दि. १५ ते दि. १९ सप्टेंबर दरम्यान तसेच दि.२६ आणि दि.२७ सप्टेंबरला काही मंडळात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांनी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबत विमा कंपनीला ७२ तासाच्या आत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ . विपीन यांनी केले होते. त्यानुसार आजपर्यंत जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज केल्याची माहिती आहे. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी करुन पंचनामे करण्यासाठी तीनशेच्यावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी विमा कंपनीच्या अॅपवर पिकांची नोंदणी करतात. यानंतर नुकसानीची माहिती कंपनीकडे पाठविली जाते. दरम्यान, मुखेड, देगलूर, बिलोली आदी तालुक्यात नदीकाठच्या भागात तसेच सखल भागात पाणी साचल्यामुळे पंचनामे करण्यास अडचणी येत असल्याची माहिती मिळाली आहे.