नांदेड - पंजाबमध्ये यात्रेकरूंना सोडून आलेल्या चार वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली असताना आता थेट लंगरसाहिब गुरुद्वारा परिसरात कार्यरत असणाऱ्या २० जणांचे अहवाल पाझिटिव्ह आल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. दोन रुग्णांचा मृत्यू सोडला, तर २४ कोरोना रुग्ण नांदेडमध्ये आहेत. त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, नांदेड शहरातील नगीनाघाट गुरुद्वारा परिसर 'कंटेन्मेंट झोन' जाहीर करण्यात आला असून नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक सेवा देखील महापालिका घरपोच देणार आहे.
यात्रेकरूंना सोडून आलेले वाहनचालक कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाने उशिरा का होईना लंगर साहिबमधील वेगवेगळ्या लोकांचे ३० एप्रिल व १ मे रोजी असे लागोपाठ दोन दिवस जवळपास ९७ लोकांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी २० लोक कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिकृत माहिती समोर आल्यानंतर नांदेडकर हादरून गेले आहेत.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून सकाळपासून अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आणखी काही अहवाल येणे बाकी असून त्यात काहीजण पाझिटिव्ह आढळून आल्यास ती बाब नांदेडकरांना चिंतेत टाकणारी आहे.
या सर्व कोरोनाबाधित रुग्णांना एनआयआर भवन कोविड केअर सेंटर येथे ठेवण्यात आले असून या भागात संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नगीनाघाट गुरुद्वारा परिसर 'कंटेन्मेंट झोन' जाहीर! -
या भागातील नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक सेवा महापालिका घरपोच देणार आहे. चिखलवाडी, कनकय्या कपाउंड, बडपुरा, शहीदपुरा, रामकृष्ण टाकीज भागांचाही समावेश आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची वजिराबाद पोलीस स्थानकात बैठक घेण्यात आली असून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.
नगीनाघाट गुरुद्वारा परिसर सील;संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण! -
नगीनाघाट गुरुद्वारा परिसर 'कंटेन्मेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी हा संपूर्ण भाग सील केला असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे उपस्थित असून नगीनाघाट परिसराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
नांदेडमध्ये तब्बल २४ कोरोना पॉझिटिव्ह; नगीनाघाट-गुरुद्वारा परिसर 'कंटेन्मेंट झोन'