नागपूर - नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊत नगरमध्ये अनोळखी तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही तरुणी २५ ते ३० वयोगटातील असून तिची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मृत तरुणीला परिसरातील नागरिक ओळखत नसल्याने पोलिसांनी तिची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला आहे.
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास परिसरातील नागरिकांना राऊत नगरमध्ये एका मोकळ्या जागेतील झुडुपात तरुणीचा मृतदेह आढळला. नागरिकांनी लगेचच घटनेची माहिती नंदनवन पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. या तरुणीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी मृत तरुणीच्या संदर्भात संपूर्ण परिसरात चौकशी केली असता, ती तरुणी त्या परिसरातील नसल्याचे समोर आले आहे. अगदी रस्त्या शेजारी असलेल्या भूखंडावर मृतदेह आढळून आला असल्याने तिची हत्या अन्य कुठे केल्यानंतर मृतदेह त्या ठिकाणी फेकून आरोपीने पोबारा केला असावा, असा संशय पोलिसांना आहे.
या शिवाय तरुणीच्या कपड्यांवरुन ती नागपूर किंवा शेजारच्या भागातील नसावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरुणीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिचे फोटो इतर पोलीस ठाण्यांना पाठवले आहेत.