नागपूर -आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. येत्या २१ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. विधानसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाले, तर विधानपरिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू झाले. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन आहे. विरोधकांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर १० मिनिटासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. कामकाज सुरू झाल्यानंतर शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विधानसभेतील घडामोडी
- ११.२२ वा. : विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
- १२.०८ वा. : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी माणिक सबाणे आणि अशोक तापकीर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
- ११.५५ वा. : भाजप सद्स्यांची जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ सुरूच
- ११.५२ वा. - संजय रायमुलकर, धर्मराम आत्राम, कालिदास कोळंबकर आणि यशोमती ठाकुर यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती
- ११.५० वा. - भाजप सद्स्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत बॅनर हातात घेऊन गोंधळ घातला.
- ११.५५ वा. - गोंधळामध्येच सभागृहाचे कामकाज सुरू
- ११.४६ वा. : सभागृहाचे कामकाज सुरू
- ११.३७ वा. : विधानसभा अध्यक्षांनी सावरकर संबधी वक्तव्य पटलावरुन काढण्याचे निर्देश दिले. त्यावरून भाजपने सभागृहात घोषणाबाजी सुरू केली.
- ११.३६ वा. सावकर मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ. विधानसभेचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब
- ११.११ वा. - मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मांडला न्या. शरद बोबडेंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव
- ११.०५ वा. - संविधान उद्देशिका आणि न्यायाधीश शरद बोबडे अभिनंदन ठरावानंतर नियम ५७ अन्वये नोटीसवर चर्चा करा - फडणवीस
- स. ११.०३ वा. - आजपासून विधी मंडळात संविधान पठण होईल; संविधान पठण करणार देशातील महाराष्ट्र पाहिलं राज्य असेल - नाना पटोले
- स. ११.०२ वा. - अधिवेशनाला सुरुवात.
- स. १०.३५ वा. - भाजप नेत्यांची बैठक संपली. विधानसभा सभागृहकडे 'मी पण सावकार' टोपी घालून सर्वजण रवाना झाले. यावेळी राहुल गांधींविरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला.
- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षाची बैठक सुरू झाली आहे..बैठकीत भाजपचे अनेक नेते सहभागी झाले आहेत. बैठकीत महाविकास आघाडीला घेरण्यासंदर्भात रणनीती आखली जात आहे.
अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे रविवारीच नागपुरात आगमन झाले. यावेळी महाविकास आघाडीतर्फे त्यांचा विमानतळावर जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच सत्कार समारंभाला आदित्य ठाकरे यांच्यासह कॅबिनेट मंत्री नितीन राऊत आणि शिवसेनेचे आमदार, खासदार उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला विधीमंडळ कामकाजाचा अनुभव नसला, तरी माझ्याकडे आत्मविश्वास भरपूर आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर मी राज्याच्या जनेतचे प्रश्न मार्गी लावणार आहे.