महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर लोकसभा : कोण जिंकणार उपराजधानीचा 'गड'? पटोले विरुद्ध गडकरी काँटे की टक्कर

भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संधी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून नाना पटोले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विदर्भ विकास महामंच आणि वंचित आघाडीकडून सागर डबरासे आणि बीएसपीने मोहम्मद जमाल यांना मैदानात उतरवले आहे.

By

Published : Mar 27, 2019, 10:32 AM IST

Updated : Mar 27, 2019, 10:28 PM IST

नाना पटोले, नितीन गडकरी

नागपूर - देशातील राजकारणाच्या मध्यस्थानी असलेले शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नागपूरला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचदृष्टीने नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. येथे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संधी देण्यात आली आहे तर काँग्रेसकडून नाना पटोले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विदर्भ विकास महामंच आणि वंचित आघाडीकडून सागर डबरासे आणि बीएसपीने मोहम्मद जमाल यांना मैदानात उतरवले आहे.

दोन्ही उमेदवारांसमोरील प्रश्न

काँग्रेसने मुस्लीम, दलित, ख्रिश्चन, हलबा या समाजातील मते आणि त्यांच्या जोडीला इतर मागासवर्गीय मतांची जोडही मिळेल, या अपेक्षेने पटोले यांना येथे उमेदवारी दिली आहे. तर मेट्रो रेल्वे, उड्डाण पूल, सिमेंट रस्ते आणि काही शैक्षणिक संस्था आपल्या कार्यकाळात येथे आल्याचे गडकरी सांगत आहेत. तर दुसरीकडे हा विकास फसवा असून नागपूरकरांवर कर्जाचे ओझे लादण्यात आले, असा पटोलेंचा आरोप आहे. शहरात विकासकामांच्या नावाखाली जागो-जागी खोदलेले रस्ते यामुळे स्थानिकांना त्रास होत आहे. तर शहरात २४तास पाणी देण्याच्या नावावर जनतेची दिशाभूल केल्याचा मुद्दा देखील नाना उचलणार आहेत. मुत्तेमवारांच्या काळात नागपूरला मिहानसारखा प्रकल्प आला खरा पण मिहानचा पाहिजे तसा विकास झाला नव्हता. यामुळे याचा रोजगारावर थेट परिमाण झालेला नाही. मात्र, मिहानमध्ये २५ हजार तरुणांना काम दिल्याचा दावा गडकरी करत असले तरी यावर विरोधकांचा तीव्र आक्षेप आहे.

भाजप बाहेरचा उमेदवार हा मुद्दा उपस्थित करणार असे गृहित धरून त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या २० वर्षांपासून आपले कुटुंब नागपुरात राहत आहे. मुलांचे शिक्षण येथे सुरू आहे. तसेच आपले मतदान येथे आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे. पटोले यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे नागपूर रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. जानेवारी २०१८ ला काँग्रेसमध्ये परतलेल्या नाना पटोले यांना पक्षातील नेत्यांना एकत्र आणण्यासोबतच काँग्रेसच्या परंपरागत मतदारांचे मन वळवावे लागणार आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघ विश्लेषण

जातीय समिकरणे

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गडकरींनी केलेल्या विकासकामांचा त्यांना फायदा मिळू शकतो. तर दुसरीकडे काँग्रेसने जातीय समीकरणाचा विचार करून नाना पटोलेंना उमेदवारी दिली आहे. पटोलेंना नागपुरात याचा विशेष फायदा होणार नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामागचे कारणही तसेच आहे नागपुर शहरात तेली आणि कुणबी मतांची टक्केवारी मोठी आहे. किंबहुना तेली समाजाची मते नागपुरात निर्णायक ठरतील. सर्वात महत्वाचे म्हणजे तेली समाज नेहमीच भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला आहेत.

नागपूरच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातून तेली समाजाचे नेते कृष्णा खोपडे हे आमदार आहेत. तर राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील तेली समाजाचेच असल्याने तेली समाजाची मते नेहमीच भाजपच्या पारड्यात पडली आहेत. याशिवाय हलबा समाजाची संख्या सुद्धा निर्णायक भूमिका निभवणार आहे. शहरात हलबा समाजाची लाखभर मते आहेत. मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे तर दलित मतदारांची संख्या निर्णायक ठरणार आहे. त्यात मागच्या निवडणुकीचा विचार केला तर बीएसपी तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळे त्यांचा ठरलेला मतदार आहे. अश्यात जातीच्या राजकारणाचा परिणाम झाला तर मतांची विभागणी होऊ शकते. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते गडकरी यांना मानणारा वर्ग सगळ्याच समाजात असल्याने त्याचा गडकरींना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

२०१४ ची परिस्थिती, ७ वेळा खासदार राहिलेल्या मुत्तेमवारांचा पराभव

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर भाजपविरुद्ध काँग्रेस असा मुकाबला झाला होता. तर तिसऱ्या क्रमांकावर बीएसपी होती. गडकरी पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांची नागपुरात असलेली प्रतिमा सगळ्यांना चालणारी होती. गडकरींच्या विरोधात ७ वेळा खासदार राहिलेले आणि तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांना काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यामध्ये गडकरींनी तब्बल २ लाख ८६ हजारांच्या मताधिक्याने मुत्तेमवारांचा पराभव केला होता.

सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व

पूर्व नागपूर - कृष्णा खोपडे

पश्चिम नागपूर- सुधाकर देशमुख

दक्षिण नागपूर- सुधाकर कोवळे

उत्तर नागपूर- डॉ. मिलिंद माने

मध्य नागपूर-विकास कुंभारे

दक्षिण पश्चिम नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मतदार संघातील राजकीय परिस्थिती -

नागपूर लोकसभा मतदारसंघात शहरातील ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. सर्वच्या सर्व सहाही विधानसभेच्या जागांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. शिवाय महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीदेखील भाजपच्याच ताब्यात असल्याने नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तर दुसरीकडे काँग्रेसमधील गटबाजीमुळे काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे. मुत्तेमवार गट, नितीन राऊत यांचा गट, राजेंद्र मुळक गट यासह लहान मोठे गट देखील सक्रिय आहेत. ज्यामुळे नागपुरात काँग्रेस विखुरलेली आहे. यासर्व गटातटांना एकत्रित करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्यांना कितपत यश येईल हा येणारा काळच ठरवेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नागपुरकर कोणाला कौल देणार हा येणारा काळच ठरवेल.

Last Updated : Mar 27, 2019, 10:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details