नागपूर - उद्यापासून म्हणजे शनिवार आणि रविवारी उपराजधानी नागपुरात 'विकेंड कर्फ्यु'चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सोमवारपासून म्हणजेच 15 मार्च ते 31 मार्च दरम्यान शहरात कडक संचारबंदी लागू केली जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केली आहे. सलग नऊ दिवस शहर बंद राहणार असल्याने नागरिक बाजार खरेदी करण्यासाठी गर्दी करतील, अशी शक्यता होती. मात्र, नागपूरकरांनी सामंजस्य दाखवले आहे.
गर्दीने सदैव गजबजलेल्या सीताबर्डी बाजारात रोज प्रमाणेच गर्दी दिसून आली, किंबहुना त्यापेक्षा कमी लोक बाजारात खरेदी करताना दिसून आले. संचारबंदी संदर्भात नागपुरातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना काय वाटते? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला, तेव्हा अनेकांनी परत टाळेबंदी नको, अशीच प्रतिक्रिया दिली. टाळेबंदीऐवजी नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांकडून दुप्पट-तिप्पट दंड वसूल करावा, अशी सूचना केली आहे.
रुग्णांची नोंद दोन हजारांनी होत असल्याने प्रशासन सतर्क
उपराजधानी नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्याबाहेर जाताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पंधराशेपेक्षा अधिक रुग्ण कोरोनाबाधित होत असल्याने १५ ते २१ मार्च दरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या आधी शनिवार आणि रविवारी 'विकेंड कर्फ्यु' असल्याने आज नागपूरचे नागरिक बाजारांमध्ये गर्दी करतील अशी शक्यता होती. मात्र, तसे चित्र बघायला मिळाले नाही. कोरोनाबाधित रुग्णांची नोंद दोन हजारांनी होत असल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. सुरुवातीला विकेंड कर्फ्युच्या माध्यमातून कोरोनाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, नागरिक प्रतिसाद देत नसल्याने संचारबंदीचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागल्याचे सांगितले आहे. यावर नागरिकांचे मत जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा अनेकांनी संचारबंदीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
आम्ही जगायचे कसे?
गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या काळात नागपूर शहरातील अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे. ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही बेताची झाली आहे. आता परत टाळेबंदी केल्यास आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न अनेकांनी व्यक्त केला. पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढवून सरकारने अधिक जनसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता परत टाळेबंदी करून राज्यकर्ते काय साध्य करणार आहेत, असा संतप्त प्रश्न विचारण्यात आला. या ऐवजी नियम मोडणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड लावावा, अशी सूचना नागरिकांनी केली आहे.