नागपूर -मृग नक्षत्र संपायला आले असताना अद्यापही पावसाची प्रतिक्षा करावी लागत आहे. गेल्या १० वर्षात मान्सूनच्या आगमनाला कधीही विलंब झालेला नाही. मात्र, यंदा वायू चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेला आहे.
नागपुरात १० वर्षात पहिल्यांदा मान्सूनचे आगमन लांबणीवर - मान्सून
गेल्या २००९ मध्ये नागपुरात २६ जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. यंदा तो रेकॉर्डदेखील मोडीत निघतो की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.
पहिल्या पावसाच्या सरी आज कोसळतील या अपेक्षेने शेतकरी चातकाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे. त्यातच विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था फारच बिकट झालेली आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने विदर्भातील बळीराजा बी-बियाणे आणि खत खरेदी करण्यासाठी कृषी केंद्राकडे फिरकला सुद्धा नाही.
सामान्यतः नागपूरसह विदर्भात पहिल्या पावसाच्या सरी १० जूनच्या दरम्यान कोसळतात. मात्र, गेल्या दशकभराच्या कालखंडात पावसाची सुरुवात १५ जून नंतरच होताना दिसत आहे. गेल्या १० वर्षात पावसाच्या आगमनाला इतका विलंब कधीही झालेला नाही. गेल्या २००९ मध्ये नागपुरात २६ जूनला मान्सूनचे आगमन झाले होते. यंदा तो रेकॉर्डदेखील मोडीत निघतो की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.