नागपूर - शहरातील सर्वात बदनाम वारंगणांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या कुप्रसिद्ध गंगा जमुना येथे पोलिसांनी दोन भुयार शोधून काढले आहेत. दोन महिन्यांपूर्वी राजस्थान येथील एका तरुणीने गंगा जमुना वस्तीतून पळ काढला होता. त्या तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांना भुयारांचा शोध घेतला,तेव्हा हे धक्कादायक वास्तव्य पुढे आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना देखील अटक केली आहे.
याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा अतिशय छोट्या प्रकारचे हे भुयार असून अल्पवयीन मुलींना या ठिकाणी कोंबले जात होते. पोलिसांच्या कारवाई ज्यावेळी होत असायची त्यावेळी लहान अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी या भुयारांचा वापर केला जात होता. वेश्याव्यवसाय अल्पवयीन मुलींना ओढल्यानंतर त्यांना मानसिक रित्या तयार करण्यासाठी त्यांच्यावर अमानवी अत्याचार करण्यासाठी या भुयारांमध्ये मुलींना डांबून ठेवले जात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा -केवळ 40 रुपये लुटीच्या प्रकरणाचा निकाल तब्बल 42 वर्षांनी.. काही आरोपी अन् साक्षीदारांचाही मृत्यू
राजस्थान येथील तरुणीने दाखवले भुयार -
काही वर्षांपूर्वी राजस्थान येथील अल्पवयीन मुलीची तिच्या नातेवाईकांना २० लाख रुपयांमध्ये विक्री केली होती. त्यानंतर काही महिने त्या मुलीला गंगा जमुनाच्या याच भुयारांमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी एका ग्राहकांच्या मदतीने त्या मुलीने गंगा जमुना वस्तीतून पळ काढला होता, त्यानंतर ती मुलगी राजस्थान येथे गेली असता पुन्हा नातेवाईकांनी तिला नागपूरला परत पाठवण्याचा प्रयत्न केला असता तिने तिथून सुद्धा पळ काढला आणि थेट लकडगंज पोलीस ठाणे गाठून घडलेली सर्व कहाणीचे पोलिसांच्या समोर कथन केले. त्यावेळी तिने दोन भुयारांची माहिती देखील पोलिसांना दिली,ज्याच्या आधारे पोलिसांनी भुयार शोधून काढले आहेत.