नागपूर- जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत कचारी सावंगा गावात दोन मुलांचा जाम पाणी पुरवठा प्रकल्पात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना कोंढाळी पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या कचारी सावंगा गावात बुधवारी रात्री उशिरा घडली.
नागपुरातील जाम पाणीसाठा प्रकल्पात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
कोंढाळी पोलीस ठाण्यांतर्गत कचारी सावंगा गावात दोन मुलांचा जाम पाणी पुरवठा प्रकल्पात बुडून मृत्यू झाला आहे.
गावातील राजेश मारोती युवनाते (वय 10 वर्षे) आणि यश दिलिप वाघाडे (वय 9 वर्षे) हे दोन्ही मुले बुधवारी (दि. 10 जून) सकाळी 11 वाजल्यापासून घरुन खेळायला बाहेर गेले होते. सांयकाळी उशीरापर्यंत दोघेही घरी न परतल्याने दोघांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. शोध सुरू असताना कचारी सावंगा येथील नळ योजनेच्या विहिरीजवळ जाम प्रकल्पाच्या काठावर दोघांचे कपडे मिळाले. त्यानंतर जाम प्रकल्पात शोध घेतल्यावर रात्री दोघांचे मृतदेह आढळले आहेत. दोघांचा पोहताना बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा -नागपुरात आज कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी ८५ रुग्ण आढळण्याची पहिलीच घटना