महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तंत्रज्ञानाचा उपयोग करून एटीएममधून लाखो रुपये लंपास करणाऱ्या हरियाणाच्या दोघांना राजस्थानातून अटक - nagpur crime news

हरियाणाच्या दोघांनी नागपुरातील 'एसबीआय'च्या विविध एटीएममधून तब्बल सहा लाख 75 हजार रुपये काढले. मात्र, त्यांच्या मूळ खात्यातून ती रक्कम वजा न झाल्याने एसबीआयच्या व्यवहारात मोठी तफावत दिसून आली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तांत्रिक तपास करत दोघांना राजस्थान राज्यातील जयपूर येथून अटक केली आहे.

सीसीटीव्ही
सीसीटीव्ही

By

Published : Jul 7, 2021, 8:19 PM IST

Updated : Jul 7, 2021, 10:30 PM IST

नागपूर- एखाद्या एटीएम कार्डच्या मदतीने एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर त्या बँक खात्यातून काढलेलली तेवढी रक्कम कमी होणे अपेक्षित आहे. मात्र, दोन सायबर गुन्हेगारांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागपूर शहरातील काही एटीएम मशीनचे सॉफ्टवेअर हॅक केले. त्यानंतर एटीएम कार्डच्या मदतीने प्रत्येक एटीएम सेंटरमधून हजारो रुपये काढले. तरीही त्यांनी वापरलेल्या एटीएमच्या बँक खात्यातून एकही रुपया कमी झाला नाही. बँकेच्या व्यवहारातील रुपयांमध्ये मोठी तफावत दिसून आल्यानंतर हायटेक चोरीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस आयुक्त

याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी या तक्रारीनुसार तापस सुरू केला असता हे प्रकरण अतिशय क्लिष्ट असल्याने सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन दोन आरोपींना राजस्थान येथून अटक केली आहे. अनिसखान अब्दुल गफ्फार आणि मोहम्मद तारिक अनवर, असे त्यांची नावे असून ते हरियाणा राज्यातील रहिवासी आहेत.

शहरातील विविध एटीएममधून काढले होते सहा लाख 75 हजार रुपये

14 ते 16 जून दरम्यान दोन आरोपींनी नागपूर शहरातील बजाज नगर, प्रताप नगर, गणेश पेठ आणि लकडगंज येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून आयडीएफसी बँकेच्या एटीएम कार्डचा वापर करत सहा लाख 75 हजार रुपये काढले होते. याबाबत फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा या हायटेक चोरीमध्ये दोन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला.

पोलिसांनी 'असा' केला तपास

एटीएममधील पैसे काढताना आरोपींकडून एका चारचाकी वाहनाचा उपयोग केल्याचे सीसीटीव्हीमधून दिसून आले. त्या आधारे पोलिसांनी त्या वाहनाचा शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला. आरोपी हे हरियाणा येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. सायबर तंत्रज्ञानाचा उपयोग करून आरोपींचा ठाव-ठिकाणा हा राजस्थान येथील जयपूर येथे दिसून आला. त्यानंतर पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी तत्काळ जयपूर येथील पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क केला. जयपूर पोलिसांनीही तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आली आहे.

तपास पथकाला पन्नास हजारांचे बक्षीस जाहीर

जयपूर पोलिसांनी अनिसखान अब्दुल गफ्फार आणि मोहम्मद तारिक अनवर या दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एका आरोपीचा सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. अतिशय क्लिष्ट प्रकरणाचा तपास करून आरोपीला जेरबंद करणाऱ्या पोलीस पथकाला 50 हजारांचे बक्षीस पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा -टिकटॉक स्टार तरुणाने अपहरण करुन अल्पवयीन प्रेयसीला केली मारहाण, दोघे अटकेत

Last Updated : Jul 7, 2021, 10:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details